Monday, January 17, 2011

भावनांवर ताबा ठेवणाराच खरा नट


'' नट म्हणजे भावनांचा कारखाना असतो. ज्याला या भावनांवर ताबा ठेवता येऊ शकतो, तोच खरा नट असतो. नटाला शब्दाचा अर्थ समजला पाहिजे. त्या शब्दांचा अर्थ त्याच्या अंगात भिनवावा लागतो आणि त्यानंतर तो बाहेर काढावा लागतो', असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्यअभिनेते प्रभाकर पणशीकर यांनी शनिवारी ठाण्यात केले. ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

ज्ञानसाधना महाविद्यालय आयोजित गुरुवर्य स. वि. कुलकणीर् गौरव व्याख्यानमालेत ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ यांनी प्रभाकर पणशीकर यांची मुलाखत घेत त्यांचा नाट्यप्रवास उलगडला. '१९४५मध्ये मी शाळेच्या संमेलनात एका नाटकात भाग घेतला होता. त्या वेळी घरातून पाठिंबा मिळणार नसल्याने अभ्यासासाठी शाळेत दोन तास थांबावे लागणार असल्याची थाप मारली होती. त्या नाटकातील अभिनयाचे माझे सर्वांनी कौतुक केले होते. म्हणून खोटेपणा आणि नाटकाचा जवळचा संबंध असतो असे मला वाटते', असे पणशीकर यांनी सांगताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली. 

बदली नट म्हणून काम करताना मी नाटकासाठी जाहिरातदेखील करायचो. भोंगा घेऊन गल्लोगल्ली फिरणे, नाटकाचे फलक रंगवणे, पडदे लावणे अशी सर्व कामे मी करायचो. मी ज्या क्षेत्रात काम करतो त्याची मला पूर्ण माहिती असणे आवश्यक वाटायचे', असे सांगताना पणशीकर यांच्यातला व्यावसायिक दृष्टीकोनही समोर आला. 

तो मी नव्हेच' या नाटकाचा मुहूर्त आचार्य अत्रे यांच्या हस्ते झाला. माझ्यासारख्या नवख्या नटाला ऐवढी मोठी भूमिका जमेल का, अशी शंका अत्रेंना वाटत होती. दिल्ली येथे ८ ऑक्टोबर १९६२ ला पहिला प्रयोग होता. प्रयोग झाल्यानंतर अत्रेंनी स्वत: भेटून माझ्या अभिनयाचे कौतुक केले', असे पणशीकर यांनी सांगितले. सन १९६३ मध्ये वासुदेव कोल्हटकर, मोहन वाघ आणि स्वत: प्रभाकर पणशीकर यांनी मिळून नाट्यसंपदा या संस्थेची निमिर्ती केली. फिरत्या रंगमंंचाची संकल्पना आम्हीच पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आणली होती, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. या प्रसंगी ज्ञानसाधना महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश प्रधान, प्रदीप ढवळे, प्रवीण दवणे उपस्थित होते. 

....................... 

मेक-अप काढायला वेळ का? 

प्रभाकर पणशीकर यांना मेक-अप काढायला नेहमी वेळ लागायचा. पण बराच वेळ झाला तरी पणशीकर बाहेर येत नव्हते. अखेरीस मी पणशीकर यांच्या खोलीत गेलो. तेव्हा पणशीकर अतिशय हळूवारपणे आणि प्रेमाने त्यांचा मेक-अप काढत होते. यावर आपण तीन तास एका भूमिकेत शिरलेलो असतो. मेक-अपमुळे आपण त्या भूमिकेत शिरू शकतो. मग या मेक-अपला ओरबाडून काढणे मला पटत नाही, असे पणशीकर यांनी सांगितले होते अशी आठवण अशोक समेळ यांनी सांगितली.

No comments:

Post a Comment