Monday, January 17, 2011

पणशीकरांना दिलीप माजगावकरने पाठवलेले हे पत्र.

दिलीप  माजगावकर, रविवार, १६ जानेवारी २०११ 
राजहंस प्रकाशनतर्फे प्रभाकर पणशीकर यांचे 'तोच मी' हे आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आले. त्या पुस्तकाची पहिली प्रत पणशीकरांना पाठवताना प्रकाशकाने पाठवलेले हे पत्र.    
पंत,
सप्रेम नमस्कार  
आपल्याइतकी तल्लख स्मरणशक्ती  नसल्यानं वेळ, वार, दिवस, महिना, वर्ष मी अचूक सांगू शकणार नाही; पण बहुधा ते ९०-९१ साल असावं. आपण मला दिलेली 'तो मी नव्हेच'ची जन्मकथा दादरच्या स्टे-वेल हॉटेलमध्ये एकाच बैठकीत मी वाचून संपवली आणि त्याच दिवशी आपल्या आत्मकथेच्या प्रकाशनाचा पहिला पाळणा माझ्या मनात हलला. त्यानंतर आपले नाटकांचे दौरे, काही लागलेले आणि काही हौसेनं अंगावर ओढवून घेतलेले, आपल्या कामांचे व्याप आणि अधूनमधून संपावर जाणारी आपली  प्रकृती.. अशी अडथळ्यांची शर्यत पार करून 'तोच  मी!' पंधरा वर्षांच्या माझ्या पाठलागानंतर आज प्रकाशित होतंय. 
''रंगदेवतेला आणि नाटय़रसिकांना अभिवादन करून 'नाटय़संपदा' सादर करीत आहे..'' प्रयोगाआधी नाटय़संपदेनं सुरू केलेल्या या उद्घोषणेच्या चालीवर मी आणि संपादक सुजाता दोघंही आता म्हणतो, ''सरस्वतीला अभिवादन करून 'राजहंस प्रकाशन' मराठी वाचकांसाठी ग्रंथरूपात सादर करत आहे, प्रभाकर पणशीकरलिखित आत्मकथन 'तोच मी!''
या आत्मकथेची पहिली  प्रत आज आपल्या हाती देतोय. आज २६ नोव्हेंबर. आपल्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस. गेली पन्नास वर्षे आपल्या संसारनाटय़ाच्या आणि 'नाटय़संपदे'च्या वाटचालीत आपल्याला साथ देणाऱ्या विजयाकाकूंना ती आपण भेट द्यावी आणि त्यांच्या  हस्ते या पुस्तकाचं  प्रकाशन करावं.
नाटकाचा पहिला प्रयोग,  चित्रपटाचा पहिला शो, पुस्तकाची  पहिली प्रत पाहताना आणि आपल्या बाळाच्या जावळावरून प्रेमानं हात फिरवताना त्याच्या निर्मात्याला होणारा आनंद, लागणारी हुरहुर आणि वाटणारी भीती ही एकाच जातकुळीची असते, असं म्हणतात. आपल्याही मनात काहीशी अशीच अवस्था असेल. वाचक या आत्मकथेचं कसं स्वागत करतात, याची आपल्याइतकीच मलाही उत्सुकता आहे. समोर असणारा वाचक आणि खुर्चीत बसलेला नाटक- चित्रपटाचा प्रेक्षक याच्या मनाचा थांग कोणाला लागलेला आहे? तो लागत नाही म्हणून तर या खेळात गंमत आहे. 
अखेर कोणतीही कला ही स्वान्त:सुखाय असते, असं आपण म्हणतो. एका उच्च आध्यात्मिक पातळीवर ते खरंही  असेल, पण जगातले सर्व सर्जनशील कलावंत रसिकांच्या या प्रेमासाठीच तर आसुसलेले असतात. जगात इतर सर्व गोष्टी जमवून आणता येतात, पण वाचकांचं प्रेम आणि प्रेक्षकांच्या पसंतीची टाळी  जमवून आणता येत नाही, ती आतूनच यावी लागते. ती आपल्याला मिळेल, असं  मनापासून वाटतं.
आपलं आत्मकथन हे ललित लेखन नाही की, केवळ कल्पनाविलास नाही. जे आणि जसं आपण जगलात, तेच आपल्या लेखनातून इथं झिरपलं आहे. यातले अनेक अनुभव वाचताना आजही सटपटायला होतं. आपण तर ते प्रत्यक्ष जगला आहात. जगताना प्रत्येक अनुभव शारीरिक आणि मानसिक पातळीवर त्याची किंमत  मागत असतो. ती किंमत आपण पुरेपूर  मोजलेली आहे. त्यामुळंच हे आत्मकथन स्वप्नांच्या मागं धावताना व्यथा-वेदना भोगलेल्या एका अनुभवसमृद्ध व्यक्तीचं आत्मकथन आहे, हे सतत जाणवत राहतं. वास्तविक, परंपरेनं आखून दिलेल्या समासाबाहेर जाऊन जगू पाहणाऱ्या आणि आयुष्यात काही नवं करू इच्छिणाऱ्या बहुतेक  माणसांचं पूर्वायुष्य हे प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीशी दोन हात करण्यात खर्ची पडलेलं आपण पाहतो. आपणही त्याला अपवाद नाही. म्हणूनच तर खडतर परिस्थितीतला आपला सुरुवातीचा प्रवास हे आपल्या आत्मचरित्राचं वेगळेपण आणि मोठेपणही नाही. 
मग या आत्मकथनात आपण वेगळे कुठं ठरता? या लेखनाला एका उंचीवर कुठं नेता? तर या साऱ्या प्रवासाकडे, त्यातल्या बऱ्या-वाईट अनुभवांकडे, भेटलेल्या लहान-मोठय़ा माणसांकडे आज वळून बघताना आपण फार प्रगल्भ मनानं बघता. तो प्रसंग, तो माणूस नीट समजून घेता. त्या वेळच्या आपल्या बऱ्या-वाईट वागण्याचं आज आपण समर्थन करीत नाही. कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाही आणि स्वत:लाही न्यायाधीशाच्या खुर्चीत बसवत नाही. आपलीही त्यावेळी चूक झाली असेल, ही शक्यता गृहीत धरता. ती घटना, तो प्रसंग केवळ आपल्या चष्म्यातून न बघता इतरांचे चष्मेही घालून बघता. 
माणसं स्वत:च्या कर्तृत्वानं मोठी होताना आपण बघतो, पण त्यांची आयुष्याविषयीची समज मोठी होतेच, असं नाही. आपण तिथं वेगळे ठरता.
म्हणून तर रांगणेकर- अत्र्यांकडून जे भरभरून आपल्याला मिळालं, त्याविषयी आपण आजही कृतज्ञ राहता. त्यांचे गुण-दोष, त्यांचे राग-लोभ ज्या आत्मीयतेनं रेखाटता, त्यावरून त्यांच्याविषयी आजही आपल्या मनात असलेला आदर आणि प्रेम जागोजागी दिसतं. त्यांच्याशी झालेल्या मतभेदात आपण दोन पावलं मागं यायला हवं होतं, अशी मनातली व्यथा तुम्ही मांडता. 'या दोन मोठय़ा माणसांशी भांडल्यानंतर ज्यांच्याबरोबर आपण भांडावं, अशा उंचीची माणसंच आज उरली नाहीत,' या आपल्या वाक्यातून अत्रे- रांगणेकरांचं मोठेपण आपण किती सहजपणे व्यक्त करता! 
'ज्या रांगणेकरांशी टोकाचे मतभेद  झाले, कंपनी सोडावी लागली, कोर्ट-कचेऱ्या कराव्या लागल्या, कटुता आली, अबोला झाला, तेच रांगणेकर माझ्या आयुष्याचे खरे भाग्यविधाते आहेत, म्हणून हे आत्मकथन मी त्यांनाच अर्पण करतोय,' असं जेव्हा लिहिता, तेव्हा तर पंत तुम्ही आभाळाएवढे मोठे होता. 
''नाटय़संपदे'च्या फुटीच्या वेळी पणशीकर तुम्हीच  नाटय़संपदेचे सर्वेसर्वा आहात, ही जवळच्या मित्रांनी केलेली कानभरणी मी हलक्या कानानं ऐकून खरी मानायला नको होती,'' ही खंत तुम्ही मोकळेपणानं व्यक्त करता. इथंच हे आत्मकथन वेगळ्या उंचीवर जातं.
या पुस्तकात अशा अनेक जागा आहेत की जिथं माणूस सांभाळण्याची आणि तो समजून घेण्याची तुमची धडपड जाणवते. तुम्हीच एके ठिकाणी लिहिलंय की, 'अखेर नाटक म्हणजे तरी काय? तर माणसांनी माणसांशी केलेल्या व्यवहाराचं ते चित्रणच असतं.' म्हणून तर नाटकातली एखाद्या पात्राची भूमिका समजून घेण्याइतकाच- खरं तर त्याहूनही अधिक- जगताना भेटलेला माणूस समजून घेण्याचा तुमचा प्रयत्न, तुमची धडपड हेच तुमच्या आत्मकथेचं एक अंत:सूत्र आहे आणि 'तो मी नव्हेच'मधल्या लखोबा लोखंडेच्या भूमिकेचं सूत्र तुम्ही जसं नाटकभर घट्ट पकडून ठेवलं  होतं, तसंच जगताना या माणसाच्या शोधाचं आणि त्याला समजून घेण्याचं सूत्र तुम्ही घट्ट पकडून ठेवलं आहे, असं पुस्तक वाचताना जाणवत राहतं.
मंगेश पाडगावकरांना जेव्हा दिल्लीच्या साहित्य अकादमीचा सन्मान  मिळाला, त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी एक गोष्ट सांगितली होती. वडील आपल्या चार मुलांना ''आयुष्यात तुम्हाला कोण व्हायचंय,'' असं विचारतात. पहिला मुलगा म्हणतो, ''मी इंजिनिअर होणार,'' दुसरा उत्तर देतो, ''मी डॉक्टर होणार,'' तिसरा सांगतो, ''मी सेनाधिकारी होणार.'' चौथा त्याच्या तंद्रीतच असतो. वडील विचारतात, ''अरे, तुला कोण व्हायचंय?'' तो म्हणतो, ''मला.. मला समजून घ्यायचंय.'' वडील विचारतात, ''काय समजून  घ्यायचंय?'' तो म्हणतो, ''मला माणूस समजून  घ्यायचाय. तो दु:खी का होतो? आनंदी का  होतो? तो महत्त्वाकांक्षी का बनतो?  ज्या यशामागं तो छाती फुटेपर्यंत धावतो, त्या यशाचा अर्थ काय? माणूस असा का वागतो? हे मला समजवून घ्यायचंय.'' आणि पुढं पाडगावकर म्हणतात, ''माझी कविता कशासाठी, याचं उत्तर या चौथ्या मुलाच्या उत्तरापेक्षा वेगळं असणार नाही.''
पंत, तुम्ही नाटक कशासाठी केलंत,  याचंही उत्तर त्या चौथ्या मुलाच्या उत्तरापेक्षा वेगळं असणार नाही. अखेर माणसाच्या आयुष्याला एक प्रयोजन असावं लागतं. सगळ्यांनाच ते मिळतं, असं नाही. तुम्ही भाग्यवान, तुम्हाला ते मिळालं. एकदा प्रयोजन मिळालं की माणसं त्यासाठी सारं झोकून देतात. कष्टाची पर्वा आणि पैशाचा हिशोब करीत नाहीत. म्हणून तर 'वीज म्हणाली,' 'पद्मिनी,' 'गवताला भाले,' अशी व्यावहारिक कोष्टकात न बसणारी नाटकं एका झिंगेत तुम्ही करू शकलात. खर्चाचा मेळ बसला नाही, म्हणून आयुष्यभर कर्ज फेडत राहिलात. आपला गाडी-बंगला झाला नाही, बँक बॅलन्स राहिला नाही, या दु:खापेक्षा केलं ते जीव झोकून केलं, परत संधी मिळाली, तर तेच करीन, या आनंदात जगलात.
'पुढचा जन्म मला मिळाला तर तो नटाचाच मिळू देत आणि याच मातीत मिळू दे,' हा आशावाद तुम्ही जागता ठेवला आहे. तो केवळ या प्रयोजनामुळंच. तुम्ही नाटकासाठी जगलात का नाटकानं तुम्हाला जगवलं, हे तुमच्या बाबतीत तरी अद्वैतच राहणार आहे. असो.
पुस्तकाबद्दल बरंच काही लिहिता येईल, पण आपल्या बाळाचं कौतुक लोकांच्या नजरेत येणार नाही इतकंच करावं म्हणून थांबतो.
कळावे, पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद!
आपला स्नेहांकित
दिलीप  माजगावकर

1 comment:

  1. Pant tar shreshth ahetch, pan Diliprao kiti chhan lihilay ho tumhi...!!
    Amachya sarkhya rasikanchya manatala agadi alagad uchalun vyakta kelat dhanyavaad.

    ReplyDelete