Monday, January 17, 2011

एक होता राजा !!!

गेल्या वर्षांत रंगभूमीवरील दोन मोठे निर्माते मोहन तोंडवळकर, मोहन वाघ म्हणता म्हणता गेले. त्याच टीममधले नटसम्राट प्रभाकर पणशीकर. आज रंगभूमीची ५० हून अधिक वर्ष कलाकार आणि निर्माता म्हणून सेवा केली. रंगभूमीवर उभे राहिले की स्टेजवरील बाकीचे कलाकार दिसेनासे व्हायचे. गेल्या २५ वर्षांत मी त्यांना जवळून पाहिले. रंगभूमीसाठी जन्माला आलेले, फक्त रंगभूमीसाठीच जगले. 
महाराष्ट्राच्या नकाशावर असं एकही गाव उरलं नसेल जिथे पणशीकरांनी नाटकाचा प्रयोग केला नाही. कुठल्याही गावाला प्रयोग असू दे किंवा कितीही प्रवास असू दे कधीही ते थकले नाहीत. प्रत्येक गावातली मंडळी त्यांच्यावर एवढं प्रेम करायची, की प्रयोग संपल्यावर ही मंडळी त्यांची बडदास्त ठेवायची. आजुबाजूला जवळपास चाळीसएक प्रेक्षक जे त्यांना वर्षांनुवर्षे ओळखायचे, ते नेहमी गप्पात सामील व्हायचे. कधीही प्रयोगाला उशीरा येणं नाही, उलट प्रयोगानंतर खूप थकवा आलेला असतानाही भेटायला आलेल्या प्रेक्षकांना प्रेमाने भेटत असत. 
निर्माता म्हणून अंदाजे ४० हून अधिक नाटकं केली आणि हजारो प्रयोग केले. स्वत:च्याच नव्हे तर विनय आपटेंच्या नाटकातही काम करत असतानासुद्धा जरा प्रेक्षक कमी दिसले तर मानधन न घेता घरी जायचे. मला निर्माता म्हणून विचाराल तर 'राजा होता तो राजा'.
'तो मी नव्हेच'मधले प्रत्येक रोल करत असताना त्या रोलमधले देखणेपण बघत राहावं असं वाटायचं. कधीही कोणत्याही गावात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं तर कोणतेही मानधन न घेता परत यायचे. पैसे कमवायचं ठरवलं असतं तर विमानसुद्धा घेऊ शकले असते. पण कधी गाडीसुद्धा घेतली नाही. रस्त्यात नुसते उभे राहिले तर कित्येक गाडय़ा प्रेमाने थांबायच्या. आजारी पडले की मला म्हणायचे स्टेज आणि प्रेक्षक दिसले की मी बरा होतो. अशा राजाच्या कुटुंबात स्वत:चा आणि त्यांच्या मुलांच्या लग्नाचा वाढदिवस कधी आला आणि कधी गेला ते कुणाला कधी कळलंच नाही.
एवढय़ा वेगवेगळ्या नाटकात वेगवेगळ्या भूमिका केल्यावर जरासुद्धा मोठेपणा आणि कुठलाही गर्व दिसला नाही. मी त्यांच्यावर मनापासून खूप प्रेम केलं. पन्नासहून अधिक वर्ष कलाकार म्हणून रंगभूमीवर टिकणं म्हणजे मस्करी नाही. माझ्या वडिलांसारखेचं ते होते. पण बघायला गेलं तर माझे जवळचे दोस्त, जवळचे मित्र. रंगभूमीवर स्वत: निर्माता आणि नट असलेले यशस्वी म्हणजे बाळ कोल्हटकर, विद्याधर गोखले, मच्छिंद्र कांबळी, बाबूराव गोखले, भालचंद्र पेंढारकर आणि प्रभाकर पणशीकर. 
जसे आचार्य अत्रेंना प्रेमाने लोक आचार्य म्हणायचे, पु. ल. देशपांडेना 'भाई' म्हणायचे तसेच रंगभूमीवरील मंडळी त्यांना प्रेमाने 'पंत' म्हणायची. याच प्रेमामुळे मला त्यांना माझ्या ग्रुपमधून अमेरिकेला न्यायचे होते. ते मी २००४ साली पूर्ण केले. त्यांच्या अभिनयाने अमेरिकेतले थिएटरदेखील कोसळले. मी त्यांच्या मागे लागून त्यांना शिकागोला फिरायला नेले. तेव्हासुद्धा त्यांनी मला विमानाचे तिकीट रद्द करून, माझ्या तिकडच्या नाटकाच्या बसमधून आले. अशा राजाबरोबर मला सेवकासारखं राहायला मिळालं. हे माझं भाग्य आणि हाच माझा आनंद. 
मी त्यांना बघायला हॉस्पिटलमध्ये गेलो, ज्या पंतांनी रंगभूमीला अभिनयाचा श्वास घ्यायला शिकवला, त्याच नटसम्राटाला श्वास घ्यायचा त्रास होत होता. एवढा मोठा अभिनयाचा औरंगजेब अशा अवस्थेत बघवत नव्हता. जसे ताजमहालावर उन्हाचे किरण पडले की जसा तो चमकतो तसे ते नाटकाच्या स्टेजवर आल्यावर चमकायचे. सतत बोलका चेहरा, स्मितहास्य, मिश्किल स्वभाव असे म्हणायला हरकत नाही. 
प्रत्येक कलाकाराने त्यांच्या स्वभावातले आणि त्यांच्या तत्त्वातले पन्नास टक्के गुण घेतले तर रंगभूमीला सोन्याचे दिवस येतील. पंत कधी राजासारखे वागले नाहीत, पण रंगभूमीवरचा राजा होता तो राजा.

No comments:

Post a Comment